म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण
म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण
(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)
आमचे बाबा ज्यांना महाराष्ट्रभर श्री म. वा. ओंकार म्हणून ओळखतात, वयाच्या ९५ व्या वर्षी, २८ ऑगस्ट २०२५ ला पुढच्या प्रवासासाठी निघून गेले.
जेमतेम चार हजार लोकसंख्येच्या झाडगाव या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून इयत्ता आठवी च्या शिक्षणासाठी ते बाहेर पडले ते कायमचेच. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व शेवटी नागपूरला स्थायिक होताना शिक्षक, विस्तार अधिकारी सहकार विभाग असा नोकरीचा प्रवास त्यांनी केला.
१९६२मध्ये शासनाने लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलेही नोकरीचे नियम लागू न करता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ढकलले. आजकालच्या कंत्राटी कामगारांसारखी त्यांची परिस्थिती झाली होती. यावेळी बाबांनी महाराष्ट्रभर फिरून सर्व जिल्ह्यामधून कार्यकर्ते गोळा करून ’महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन’ ही संघटना स्थापित केली आणि तब्बल ३५ वर्षे ते अनुक्रमे सचिव आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. वेळोवेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सारखे वेतन, भत्ते व इतर सोयी सवलती मिळाव्या यासाठी शासनासोबत संघर्ष केला. यासाठी वेळप्रसंगी हायकोर्ट तथा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केसेस लढल्या व विजय मिळवला. या संघर्षात त्यांच्या एका हाकेसरशी संपावर जाणारे व वापस कामावर रुजू होणारे कर्मचारी, कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळीचे नेते सुद्धा सामील होते. संप मागे घेताना कामाचे तास भरून देण्याची हमी देणारे ते एकमेव नेते होते जेणेकरून शासन किंवा कर्मचारी कोणाचेही नुकसान होता कामा नये.
त्यावेळी कार्यरत इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना जसे पटवारी,अभियंते,लघुवेतन आणि इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा एकत्रित ’महाराष्ट्र राज्य कर्मचारी समन्वय महासंघ’ सुद्धा त्यांनी स्थापित केला आणि अध्यक्ष म्हणून बरीच वर्षे नेतृत्व केले.
शासन निर्णय बऱ्याच वेळा क्लिष्ट असतात, त्यांचे अर्थ लवकर उमगत नाही. अशा शासन निर्णयांचा कर्मचाऱ्यांना सोप्या भाषेत अनुवाद किंवा सहज आकलन व्हावे अशा दृष्टीने ना नफा ना तोटा या तत्त्वा वर दर महिन्याला ’भवितव्य’ नावाचे मासिक त्यांनी कित्येक वर्ष चालविले. आम्ही लहान असताना त्या मासिकांवर लेबल लावणे आणि तिकीट लावणे ही कामे करत असू. तसेच विविध विषयांच्या शासन निर्णयांचे संकलन करून ’भवितव्य पथदर्शक’ पुस्तके त्यांनी लिहिली. या पुस्तकाच्या सहा आवृत्ती आणि ३६ हजार प्रति वितरित झाल्या.
या सर्व पुस्तकांचे मानधन किंवा वर्गणी ही युनियनच्या खात्यात जमा होत असे. प्रत्येक वेतन आयोगाच्या समोर त्यांनी जिल्हा परिषद तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे हक्क आणि वेतन अबाधित राहावे यासाठी त्यांची बाजू मांडली व वेतन आयोग लागू झाल्यावर त्यांच्या तरतुदीनुसार वेतन कसे निश्चित करावे यासाठी सुद्धा पुस्तके लिहिली.
बीएससी गणितात केले असल्याने त्यांची स्मरणशक्ती तसेच कॅल्क्युलेटिव वृत्ती ही अतिशय उच्च दर्जाची होती, सोबत इंग्रजीची जोड असल्याने ते कोणाही मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यांसमोर सहज आपले बोलणे मांडत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी वेळप्रसंगी चर्चा केल्या आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. त्यांचे जुने सहकारी सांगत की माजी मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या सेक्रेटरीना सांगून ठेवले होते की, ओंकार सांगेल ते तुम्ही त्वरित अभ्यास करून अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. यावरून त्यांचा अभ्यास आणि रास्त मागण्या मांडण्याची त्यांची सचोटी ही शासनाने सुद्धा मान्य केली होती हे दिसते. या सर्व कामासाठी स्वतः गाडी चालवून किमान दहा वेळा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केलेल्या बाबांना महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यांमधील अंतर तोंडपाठ होते.
सहकार विभागात उपनिबंधक पदावर असताना बाबा निवृत्त झाले परंतु तब्बल ३३ वर्ष ते जिल्हा परिषद युनियन वर डेप्यूटेड होते हा एक विक्रमच म्हणावा लागेल. निवृत्त झाल्यानंतर वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत पूर्णपणे झोकून देऊन काम करत असताना त्यांना बऱ्याच वेळा आजारपणांना सामोरे जावे लागले होते. तरीही ते न डगमगता आपले काम नेटाने करीत. महिन्याला सुमारे २२-२४ दिवस प्रवास करत असल्याने आम्हाला त्यांचा सहवास फारसा लाभला नाही पण जो काही लाभला तो लाखमोलाचा होता. घरी सतत कार्यकर्ते किंवा आपले प्रश्न घेऊन येणारे कर्मचारी यांची लगबग असायची. घरीच ऑफिस असल्याने बऱ्याच वेळा ते अवचित जेवणासाठी सुद्धा असायचे आणि आमची आई विना तक्रार त्यांचं जेवण आणि बाकी व्यवस्था बघायची. आयुष्यात अनेक सत्कार आदर मिळालेले बाबा संप यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या हत्तीवरच्या मिरवणुकीची आठवण काढत.
सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळत असल्याने आता खूप काही करण्यासारखे राहिले नाही असे ते म्हणत.
हे करत असतानाच बजाज नगर अभ्यंकर नगरच्या मध्ये असलेला एक मोठा सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेला प्लॉट अभ्यंकर नगर नागरिक मंडळाला शासनातर्फे लीज वर मिळाला होता. मंडळाच्या विनंतीनुसार त्यांनी मुख्यमंत्री निधीतून तेथे प्रेक्षागृहाच्या निर्मितीसाठी काही निधी मिळवून आणला. ह्या प्लॉटवर त्यांनी नागपुरातले दुसरे ज्ञानेश्वर मंदिर उभारले. सोबत ओपन एयर थेटर आणि काही ब्लॉक काढले. यामध्ये त्याच्या भाड्यातून मंदिराची व्यवस्था लागू शकेल अशी योजना होती. बजाज नगर , अभ्यंकर नगर परिसरातून वर्गणी गोळा करताना त्यांनी जी वर्गणी जो व्यक्ती देईल ती रक्कम ते प्रेक्षागृह भाड्याने घेतील त्यातून पूर्ण वजा केली जाईल अशी अफाट योजना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. छोटेखानी असलेले ज्ञानेश्वरांचे मंदिर हळूहळू नावारूपास आले. कालांतराने ती बिल्डिंग जीर्ण झाली असल्याने जीर्णोद्धाराची कल्पना त्यांनीच मांडली आणि ती पूर्णत्वास नेतांना स्वतः पहिल्या मंदिराच्या उभारण्याच्या वेळी सारखीच तन-मन-धनाने सहकार्य केले. अर्थात त्यांना बजाज नगर मधील कित्येक सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली हे सांगणे येथे संयुक्तिक राहील.
पूर्वी शासकीय तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पगार तुटपुंजा असे. त्यामुळे ते भाड्याने राहत व त्यांची परिस्थिती अजूनच गंभीर होई. हे लक्षात घेऊन बाबांनी शासन स्तरावर मागणी मांडून कर्मचाऱ्यांना सरळ सहा टक्के व्याजदराने गृह कर्ज मिळण्यासंबंधी निर्णय निर्गमित करून घेतला. याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना झाला. नागपूर येथे त्यांनी ’कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेची’ स्थापना केली आणि बाबुळखेडा भागात शेती विकत घेऊन तिला एनआयटीच्या नियमानुसार व्यवस्थित विकसित करून त्यावर तब्बल १०२ स्वतंत्र घरांची निर्मिती केली. फक्त ५००० रुपयात वन बीएचके घरे प्लॉट सहित झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी सोय झाली. या अख्ख्या सोसायटीमध्ये त्यांचा एकच प्लॉट होता हे सांगणे येथे उल्लेखनीय आहे. या कामावरील कंत्राटदार पळून गेल्यावर स्वतः त्यांनी देखरेखी खाली मजूर लावून आपण दिलेल्या आश्वासनाचे पालन केले. सुरुवातीला तिथे जाण्यास लोक राजी होत नव्हते कारण एक दीड किलोमीटर कुठलीही वस्ती नव्हती, पण हळूहळू ती वस्ती गजबजली आणि आता त्या भागातली सगळ्यात व्यवस्थित विकसित असलेली वसाहत म्हणून नावारूपास आली आहे. कर्मचाऱ्यांनी त्या नगराला ’ओंकार नगर’ नाव दिले तेव्हा बाबांनी प्रचंड विरोध केला होता पण त्यांना न जुमानता त्यांच्या सहकाऱ्यांनी ते नाव दिले. या सोसायटीतर्फे दुसरा महात्मा फुले नगर लेआउट सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी विकसित केला.
हे सगळं करत असताना नातेसंबंध, लोकांकडे भेटी, कार्यप्रसंग हे त्यांनी कसे पाळले हे कोडे आम्हालाही कधी कधी उमगत नाही. कित्येक मुला मुलींची लग्न त्यांनी जुळवून दिली. एवढे कार्य मग्न राहून सुद्धा घरच्या आघाडीवर शक्य तितके त्यांनी लक्ष दिले, मी व माझ्या दोन्ही बहिणी सौ संजीवनी भोयर व सौ वर्षा गणोरकर यांचे शिक्षण आणि संसार सुरळीत होईल याची काळजी घेतली. माझे मोठे बंधू श्री अनिल ओंकार हे इंजिनियर झाल्यावर त्यांनी उद्योग करावा याचा आग्रह धरला आणि त्या उद्योगाच्या उभारणीत स्वतः उभे राहून बांधकाम करून, प्रसंगी लोकांच्या घरी सामान पोहोचवून, त्यानंतर त्यांच्या शोरूम मध्ये बसून ग्राहक सांभाळून विविध रूपात त्यांनी केलेली मेहनत आज त्या व्यवसायाच्या विस्तारित रूपात सगळ्यांना दिसते.
उद्योग सुरू करताना कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने वागवून त्यांची काळजी घेणे, कौटुंबिक वातावरण ठेवणे, घेतलेले कर्ज आणि व्याज वेळेवर फेडणे, सरकारी देणे किंवा कर वेळेवर भरणे, पुरवठादारांना त्यांचे देणें नेऊन पोहोचवणे, ग्राहकांना कबूल केलेल्या गुणवत्तेपेक्षा चांगले देणे, खर्चानंतर उरलेल्या पैशात घरच्या खर्चापुरते पैसे काढून व्यवसाय विकास करणे आणि कुणी कसेही वागला तरी संबंध तोडू नये असे काही मूलमंत्र घालून दिले होते.
एकदा भेटलेल्या व्यक्तीची पक्की ओळख ठेवण्याची त्यांची कला अतिशय अद्भुत होती. ९४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या बाबांनी अतिशय कार्य मग्न राहून अनेकांच्या जीवनाचे सोने केले. हजारो लोकांना नोकऱ्या लावून दिल्या, त्यांच्या बदल्यांसाठी प्रयत्न केले किंवा करवून घेतल्या तेही अगदी निरपेक्ष भावनेने. निवृत्त झाल्यानंतर कळंब येथे त्यांनी कित्येक वर्ष शेती केली त्यात विविध प्रयोग केले. पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मग शेती ला जाणे अशक्य झाल्याने त्यांनी ती विकली. निवृत्त झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय मंजूर संघाशी संलग्न असलेल्या सरकारी कर्मचारी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते . केंद्राच्या चौथ्या वेतन मंडळाला त्यांनी दिलेल्या निवेदन आणि स्पष्टीकरण याचे वेतन मंडळाच्या सदस्यांनीही कौतुक केले होते.
वयाच्या ७५ व्या वर्षी ते कॉम्प्युटर व टॅली सॉफ्टवेअर शिकले. अकाउंटिंग चे ज्ञान अवगत असल्याने ते उत्तमरीत्या अकाउंट सांभाळत आणि घरी सगळ्यांना अकाउंटिंग शिकवत. ७५ व्या वर्षानंतर ज्ञानेश्वर मंदिरात होणाऱ्या योग वर्गामध्ये ते आईला घेऊन नियमित जात आणि योगाची पहिली परीक्षा ते प्राविण्यासह पास झाले. तब्बल १० वर्षे योगाभ्यास आणि जोडीने संयमित आहार घेतल्याने त्यांना दीर्घ आयुष्य लाभले. निस्वार्थ भावनेने शिकवणाऱ्या योग शिक्षिकांचा ते गुरुपौर्णिमेला यथोचित सन्मान देखील करत.
मध्यंतरी त्यांनी तरुण भारत आणि बाकी वृत्तपत्रांमध्ये पाचशेवर विविध विषयांवर लेख लिहिले. हे लेख लिहीत असताना विषयाचा पूर्ण अभ्यास करून आकडेवारीसह मांडत. आम्हाला कित्येक लोक अजूनही सांगतात की त्यांच्या लेखाची आम्ही वाट बघायचो. त्यातून त्यांनी पाच ते सहा छोटी पुस्तके लिहिली. त्यामध्ये ’विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे आणि त्यावर दीर्घकालीन उपाय’ तसेच ’रायझिंग प्राइसेस: रीजनस अँड रेमेडीज’ ही दोन पुस्तके बऱ्याच लोकांनी वाचली आणि त्याची प्रशंसाही केली.
जलसंधारणाचे एक मॉडेल त्यांनी तयार केले होते ज्या योगे पावसाचे एकही थेंब पाणी समुद्रात जाऊ नये. हे मॉडेल त्यांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना पाठवले होते त्यापैकी काहींनी त्याची पोच पण दिली होती.
विविध विषयांवर लेख लिहीत असताना वृद्धाश्रम आणि त्यातील परिस्थिती यावरही त्यांनी लेख लिहिला. १९९५ मध्ये सुरू झालेल्या वृद्धाश्रमांचे अनुदान नंतरच्या सरकारने २००० मध्ये थांबविले त्यामुळे अनेक वृद्धाश्रमांची स्थिती दयनीय झाली. अशावेळी बाबांनी आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमासाठी निधी संकलन केले वेळोवेळी भेटी देऊन तिथे स्वतः शक्य ती मदत केली. हे कार्य कोरोना येईपर्यंत सुरू होते. दृष्टी कमजोर झाल्याने त्यांनी हळूहळू लिखाण थांबवले.
नागपूर मध्ये एनआयटी लीज वर हजारो भूखंड आहेत. त्यांचा वार्षिक ग्राउंड रेंट अचानक अनेक पटीने वाढवण्यात आला होता. त्याविरुद्ध देखील बाबांनी विविध वस्त्यांमधील भूखंड धारकांना एकत्र करून संबंधित अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले व तिथून दाद न मिळाल्याने त्यावेळी आमच्या विभागाचे आमदार असलेले माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आंदोलन चालवले आणि हायकोर्टात केस देखील दाखल केली होती.
करारी बाणा असणारे बाबा नातवंडांसोबत सहजरित्या खेळत, मिसळत. कुठलाही मोठा आजार नसलेल्या बाबांना वयाच्या ८७ व्या वर्षी आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले त्याच्या मेजर ऑपरेशन मधून देखील ते पूर्ण ताकतीने पुन्हा उभे राहिले. कोरोना काळात लोकांशी संपर्क तुटल्यामुळे की काय, त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला. तरी देखील ते मागील दोन-तीन महिने आधीपर्यंत हिंडते फिरते होते.
काळाच्या पुढे चालणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे अकरा वर्षांपूर्वीच मृत्यूनंतर काय करावे काय करू नये याचा वस्तू पाठ स्वतः लिहून ठेवला होता. अशाप्रकारे आमचे बाबा अगदी
यथार्थ जीवन जगले आणि आम्हाला जगण्याची उमेद आणि कला शिकवून अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
’क्षणोक्षणी आहे आमच्या मनी तुमचीच आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण’.
ओम शांती!
डॉ. प्रशांत ओंकार
विनम्र अभिवादन.🙏
ReplyDelete